पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या अमानुष प्रकारानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून विविध शहरांमध्ये आंदोलनं, मोर्चे आणि निषेध सुरू झाले आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय नेत्यांकडून सातत्याने केली जात आहे. या घटनेमुळे महिलांच्या आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पोलिसांनी पुढील तपासासाठी घटनास्थळी नेले असता अनेक धक्कादायक माहिती समोर आली. पोलिस तपासानुसार, आरोपी अत्याचारापूर्वी काही काळ गोठ्यात थांबून होता. तसेच पीडित मुलगी जिवंत आहे की नाही हे तपासण्यासाठी तिच्या छातीत जोरात मारहाण केल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. या संपूर्ण घटनेने तपास यंत्रणाही हादरून गेली असून पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. चौकशीदरम्यान आरोपीने आपण त्या दिवशी नशेत असल्याचे सांगत स्वतःचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून या दाव्याची सखोल चौकशी सुरू असून तो स्वतःची बाजू वाचवण्यासाठी असे बोलत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर कायदे आणि जलद न्यायव्यवस्था लागू करण्याची मागणीही आता अधिक जोर धरू लागली आहे.




