विमान अपघाताच्या चौकशीवर मोठं विधान; २०२९ च्या उमेदवारीबाबतही जय पवारांनी सोडलं मौन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार रिंगणात असून, त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. मतदानाचा उत्साह पाहता, सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला की, बारामतीमध्ये यंदा ८५ ते ९० टक्के मतदान होईल आणि सुनेत्रा वहिनी रेकॉर्ड ब्रेक मताधिक्क्याने विजयी होतील. “आमच्या पोलिंग एजंट्सनी दिलेल्या माहितीनुसार काम जोरात सुरू आहे, ४ तारखेला निकाल स्पष्ट होईलच,” असे जय पवार म्हणाले.
या संवादादरम्यान जय पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक भाष्य केले. हा केवळ अपघात होता की घातपात, या प्रश्नावर बोलताना त्यांनी संयमी भूमिका घेतली. “जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत लोकांची दिशाभूल करणे चुकीचे आहे. मी स्वतः सीआयडी (CID) टीमच्या संपर्कात असून तपास यंत्रणा योग्य दिशेने काम करत आहेत. येत्या दोन-तीन आठवड्यात या प्रकरणाचे सत्य समोर येईल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच रोहित पवार यांच्या संशयी विधानांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, तपास यंत्रणांना अहवाल लवकर सादर करण्याची विनंती केली असून मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत.
केवळ चालू पोटनिवडणुकीवरच नाही, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबतही जय पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “२०२९ मध्ये मी उमेदवार असावे, अशी मागणी लोकांची आहे, माझी वैयक्तिक नाही. सध्या मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि भविष्यातही लोकांसाठी असेच काम करत राहीन,” असे म्हणत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे संकेत दिले. अजितदादांच्या निधनानंतर भावनिक झालेल्या बारामतीत आज मोठ्या संख्येने नागरिक मतदानासाठी बाहेर पडत असून, पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीतील जय पवार सध्या पूर्णपणे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.




