लखनौकडून चेन्नईचा ७ विकेट्सने धुव्वा; गुणतालिकेत घसरण झाल्याने ‘थाला’च्या पलटणची डोकेदुखी वाढली, गुजरात आज इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
आयपीएल २०२६ चा १९ वा मोसम आता अंतिम टप्प्यात आला असून प्लेऑफच्या उर्वरित जागांसाठी संघांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. मात्र, या स्पर्धेच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या दोन तळाच्या संघांनी गेल्या दोन दिवसांत दाखवलेल्या धडाक्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या दिग्गजांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांनी स्वतः स्पर्धेतून बाहेर पडताना इतर प्रबळ दावेदार संघांच्या अडचणीत मोठी वाढ केली आहे. प्रथम १४ मे रोजी मुंबईने पंजाब किंग्सला पाचव्या पराभवाचा झटका दिला, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १५ मे रोजी लखनौने एकाना स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सचा ७ विकेट्सने पराभव करत गेल्या पराभवाचा वचपा काढला. या अनपेक्षित निकालांमुळे पंजाब पाठोपाठ आता चेन्नईच्या प्लेऑफचे समीकरण पूर्णपणे फिस्कटले आहे.
लखनौ विरुद्धच्या या दारूण पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सला गुणतालिकेत आणि नेट रनरेटमध्ये खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. १२ सामन्यांनंतर सहाव्या पराभवाचा सामना करावा लागलेला चेन्नईचा संघ थेट पाचव्या स्थानावरून सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सामन्यापूर्वी +०.१८५ असलेला त्यांचा नेट रनरेट आता थेट +०.०२७ वर घसरला असून, चेन्नईची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आता केवळ २८ टक्क्यांवर आली आहे. चेन्नईला जर आता बाद फेरीत प्रवेश करायचा असेल, तर त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यांत सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स विरुद्ध केवळ विजयच नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.
दुसरीकडे, आज म्हणजेच १६ मे रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा ६० वा महामुकाबला रंगणार आहे. गुजरात टायटन्ससाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून, जर आज त्यांनी कोलकातावर विजय मिळवला, तर ते अधिकृतरित्या आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारे मानकरी ठरतील. त्यामुळे आजच्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.




