IPL 2026 : ‘हनीट्रॅप’ आणि सुरक्षेचा धोका! बीसीसीआयने खेळाडूंसाठी जारी केली कठोर नियमावली

spot_img

हॉटेलमधील ‘त्या’ गुप्त भेटींवर आता बीसीसीआयची करडी नजर; विनापरवाना प्रवेश देणाऱ्यांवर होणार कारवाई

इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा थरार सुरू असतानाच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. मैदानाबाहेरील धोके, विशेषतः ‘हनीट्रॅप’ आणि खेळाडूंना टार्गेट करून केले जाणारे गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डाने सर्व १० फ्रेंचायझींना कडक आदेश दिले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे की, खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफला भेटायला येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, मग ती कितीही जवळची असली तरी, आता थेट हॉटेल रूममध्ये जाता येणार नाही. यापुढे पाहुण्यांना केवळ हॉटेलची लॉबी किंवा रिसेप्शन लाऊंज यांसारख्या सार्वजनिक ठिकाणीच भेटी घेता येतील.

काही गंभीर प्रकरणांची दखल घेत बोर्डाने म्हटले आहे की, अनेकदा टीम मॅनेजरच्या परवानगीशिवाय अनोळखी लोक खेळाडूंच्या रूमपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे केवळ सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत नाही, तर लैंगिक शोषणासारखे खोटे आरोप किंवा ब्लॅकमेलिंगसारख्या धोक्यांची टांगती तलवार असते. हे टाळण्यासाठी आता प्रत्येक भेटीचा लेखी रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून, जर एखाद्या व्यक्तीला रूममध्ये जायचे असेल, तर त्यासाठी टीम मॅनेजरची लेखी परवानगी अनिवार्य असेल.

बीसीसीआयची ‘आयपीएल ऑपरेशन्स टीम’ या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची अचानक तपासणी करणार आहे. हाय-प्रोफाइल क्रिकेट विश्वातील खेळाडूंना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न होऊ शकतात, असा इशाराही बोर्डाने फ्रेंचायझींना दिला आहे. त्यामुळे केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही खेळाडूंनी अधिक सतर्क राहावे, यासाठी बोर्डाने हे ‘सुरक्षा कवच’ अधिक भक्कम केले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित फ्रेंचायझीवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ