१६ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; गुणपडताळणी आणि एटीकेटी सुविधेचा तपशील एका क्लिकवर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे घोषित केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, परंपरेनुसार यंदाही निकालाच्या शर्यतीत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९६ टक्के असून मुलांचा टक्का ८९.५६ इतका नोंदवण्यात आला आहे. विभागीय निकालात यंदाही निसर्गरम्य कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे, तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबद्दल शंका आहे किंवा गुण कमी मिळाले आहेत, त्यांच्यासाठी मंडळाने महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्यापासून, म्हणजेच ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत विद्यार्थी mahasscboard.in वरून ऑनलाइन पद्धतीने गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी प्रति विषय ५० रुपये शुल्क आकारले जाईल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास आधी छायाप्रत (Photo copy) घेणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, यंदापासून विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि प्रमाणपत्र वेगळे न मिळता, एकाच कागदावर दोन्ही गोष्टी एकत्रित स्वरूपात मिळणार आहेत.
परीक्षेत अपयश आलेल्या किंवा एक-दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या ४१,०६५ विद्यार्थ्यांसाठी ‘एटी-केटी’ (ATKT) ची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता त्यांना अकरावीत प्रवेश घेता येईल. निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी शिक्षण मंडळाने ‘टेलिमानस’ (14416) आणि ‘मनोदर्शन’ (8448440632) या हेल्पलाइन क्रमांक जारी केले असून, ३१५ समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी दुपारी १ वाजल्यापासून विविध अधिकृत संकेतस्थळांचा वापर करू शकतात.




