जर्मन अर्थशास्त्रज्ञ जोकिम क्लेमेंट यांचा दावा; सलग ३ वेळा अचूक अंदाज ठरल्यानंतर आता ‘या’ संघाला दिले जेतेपद
फिफा वर्ल्डकप २०२६ (FIFA World Cup 2026) या फुटबॉल महाकुंभाला येत्या १२ जूनपासून सुरुवात होत असून, याचा अंतिम सामना २० जुलै रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच यंदाचा वर्ल्डकप कोण जिंकणार, याचे धक्कादायक भाकीत वर्तवण्यात आले आहे. जर्मन अर्थशास्त्रज्ञ जोकिम क्लेमेंट (Joachim Klement) यांनी आपल्या विशेष संगणकीय मॉडेलच्या (Computer Model) आधारे नेदरलँड (Netherlands) हा संघ यंदा जगज्जेता ठरेल असा दावा केला आहे. क्लेमेंट यांनी १२ वर्षांपूर्वी मस्करीत हे भाकीत वर्तवण्यास सुरुवात केली होती, मात्र त्यांनी वर्तवलेली आतापर्यंतची सर्व भाकीते १००% खरी ठरल्याने यंदा क्रीडाविश्वाची धडकन वाढली आहे.
जोकिम क्लेमेंट यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी २०१४ मध्ये जर्मनी, २०१८ मध्ये फ्रान्स आणि २०२२ च्या कतार वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिना जिंकणार असल्याचे म्हटले होते आणि प्रत्यक्षात तसेच घडले. आता त्यांनी २०२६ च्या २३ व्या पर्वात नेदरलँड पहिल्यांदाच जेतेपदाची पताका उंचावेल असे सांगितल्याने फुटबॉल चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
जोकिम क्लेमेंट यांचे संगणकीय मॉडेल काय सांगते?
क्लेमेंट यांनी केवळ विजेत्याचे नावच नाही, तर उपांत्यपूर्व (Quarter-Finals) फेरीपासूनचा संपूर्ण आराखडाच मांडला आहे:
उपांत्यपूर्व फेरीतील सामने (Quarter-Finals):
१. नेदरलँड्स विरुद्ध फ्रान्स
२. स्पेन विरुद्ध बेल्जियम
३. इंग्लंड विरुद्ध जपान
४. पोर्तुगाल विरुद्ध अर्जेंटिना
- उपांत्य फेरीतील लढती (Semi-Finals):
क्लेमेंट यांच्या मॉडेलनुसार नेदरलँड, इंग्लंड, पोर्तुगाल आणि स्पेन हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील.- पहिला सामना: नेदरलँड्स विरुद्ध स्पेन
- दुसरा सामना: इंग्लंड विरुद्ध पोर्तुगाल
महामुकाबला: अंतिम फेरीत कोण भिडणार?
क्लेमेंट यांच्या भाकीतानुसार, अंतिम सामन्यात पोर्तुगाल आणि नेदरलँड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येतील. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा शेवटचा वर्ल्डकप असण्याची शक्यता असल्याने जगभरातील क्रीडाप्रेमींची भावनिक पसंती पोर्तुगालला असेल. मात्र, क्लेमेंट यांच्या संगणकीय समीकरणाने नेदरलँडच्या बाजूने कौल दिला आहे.
सलग तीन वेळा अचूक ठरलेले जोकिम क्लेमेंट यांचे भाकीत यंदा चौथ्यांदा खरे ठरणार का? ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न भंगणार की नेदरलँड नवा इतिहास रचणार? हे पाहणे आता अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.




