गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेला धुरंधर २ हा बहुचर्चित चित्रपट आता अखेर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अॅक्शन, थरार आणि दमदार कथानकामुळे या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. आता थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत झळकला आहे. हा चित्रपट भारतात JioHotstar या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. 4 जून 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी प्लॅटफॉर्मवरील नोटिफिकेशनमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
OTT आवृत्तीमध्ये प्रेक्षकांसाठी काही खास गोष्टी असणार आहेत. थिएटरमध्ये या चित्रपटाचा रनटाइम 3 तास 49 मिनिटांचा होता. मात्र OTT वर हा सिनेमा ‘Raw & Undekha’ स्वरूपात म्हणजेच कोणत्याही सेन्सॉर कटशिवाय प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे डिजिटल आवृत्तीचा रनटाइम 3 तास 52 मिनिटांचा असणार आहे.
विशेष म्हणजे, थिएटरमध्ये सेन्सॉर बोर्डाने हटवलेले काही अॅक्शन आणि थरारक दृश्ये आता OTT वर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चित्रपटाचा अधिक रॉ आणि दमदार अनुभव प्रेक्षकांना घरबसल्या घेता येणार आहे. चाहत्यांमध्ये सध्या या डिजिटल प्रीमियरची जोरदार चर्चा सुरू आहे.




