Devendra Fadnavis : पोलिसांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५,४५९ घरांसाठी १,७६८ कोटींचा निधी मंजूर

spot_img

महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून, हजारो पोलिसांच्या घरकुल प्रस्तावांना अखेर मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरबांधणीसाठी तब्बल १,७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीला हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे हे प्रस्ताव बराच काळ प्रलंबित होते. ‘घरबांधणी अग्रीम’ (HBA) योजनेअंतर्गत पोलिसांनी घर खरेदी किंवा नवीन घर बांधण्यासाठी अर्ज केले होते. प्रस्तावांची तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरून मागील महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, २०१४ ते २०१९ या काळात पोलिसांसाठी व्याजसवलत अनुदान योजना प्रभावीपणे राबवण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना बंद करण्यात आली. सत्तेत पुनरागमन केल्यानंतर सरकारने ही योजना पुन्हा प्राधान्याने सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील पोलीस दल दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी काम करत असताना त्यांना सुरक्षित आणि स्थिर निवासाची गरज असल्याचे सरकारचे मत आहे. या निधीमुळे अनेक पोलीस कुटुंबांना स्वतःचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या निर्णयाचे पोलीस दलातून स्वागत करण्यात येत असून, हा निर्णय पोलिसांच्या कल्याणासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ