Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; 56 लाखांना कर्जमाफीचा लाभ, 48 हजार कोटींची वीजबिल माफीही जाहीर

spot_img

किसान मोर्चाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत राज्यातील शेतकरी वर्गासाठी महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी सत्काराबाबत आपली भूमिका स्पष्ट करत, शक्यतो सार्वजनिक सत्कार स्वीकारत नसल्याचे सांगितले. मात्र, किसान मोर्चाच्या आग्रहामुळे हा सन्मान स्वीकारला, कारण यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचना प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असल्याची घोषणा करत मोठा दिलासा दिला. 2019 मधील कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरलेल्या, पण नंतर कर्जफेड न झाल्याने डिफॉल्टर झालेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, काही शेतकऱ्यांनी 10 ते 12 हजार रुपये भरूनही प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिले होते. अशा पात्र शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करत राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 48 हजार कोटी रुपयांचे जुने वीजबिल माफ करण्यात येणार असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाषणादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. महायुती सरकारने कोणत्याही निवडणुका लक्षात न घेता शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेतले असून विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सरकारची जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम राहील आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी भविष्यातही अशाच ठोस योजना राबवल्या जातील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ