राज्यातील मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यासंदर्भातील चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रिपदाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्यातील आमदार सुनील शेळके आणि विदर्भातील आमदार राजू नवघरे यांची नावेही संभाव्य मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे यांनी यापूर्वी महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे आगामी फेरबदलात त्यांना पुन्हा संधी मिळते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या सर्व घडामोडींबाबत सरकारकडून किंवा संबंधित नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.




