राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेत अनेक नेते आणि खासदार सहभागी झाल्याने पक्षाची ताकद वाढल्याची चर्चा सुरू असताना, मंत्रिपद किंवा अन्य महत्त्वाच्या पदांसाठी दावा करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर शिंदे यांनी महायुती ही केवळ सत्तेतील पदांसाठी नव्हे, तर समान विचारांच्या आधारावर उभी असलेली युती असल्याचे सांगितले. शिवसेना एनडीएला अधिक बळकट करण्यासाठी काम करत राहील आणि पदांसाठी कधीही सौदेबाजी केली नाही तसेच पुढेही करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी NEET परीक्षेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनावरही भाष्य केले. २०१४ पूर्वीचे घोटाळे आणि त्यानंतर देशात झालेला विकास युवकांनी जवळून पाहिल्यामुळे आजही तरुणांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर कायम असल्याचा दावा त्यांनी केला. काही विरोधी पक्ष देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. मात्र, देश आणि राज्याची लोकशाही परंपरा व संस्कृती मजबूत असल्याने अशा प्रयत्नांना यश मिळणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




