मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देतानाच त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी आणि इतर कृषी योजनांमुळे शेतकऱ्यांना कसा लाभ होणार आहे, याची माहिती दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘रामरक्षा आंदोलन’ावरही निशाणा साधत, रामाच्या नावाने आंदोलन करणाऱ्यांनी किमान रामरक्षा पाठ किंवा वाचता यायला हवी, अशी उपरोधिक टिप्पणी केली.
फडणवीस म्हणाले की, आंदोलनाला धार्मिक स्वरूप देण्यापेक्षा त्या विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. गरज पडल्यास आपण स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत रामरक्षा म्हणण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. रामरक्षेचे किमान काही भाग तरी वाचता यायला हवेत, अन्यथा अशा आंदोलनांचा हेतूच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो, असा टोला त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे हे सध्या निराश आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेतून अशा प्रकारची भूमिका घेत असल्याची टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.




