केंद्र सरकार महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा संसदेत मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असून, या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यापूर्वी या विषयांवर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला होता. मात्र, आता काही अटी आणि सुधारणा स्वीकारल्या गेल्यास या विधेयकांना पाठिंबा देण्याबाबत INDIA आघाडीतील अनेक पक्ष सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात या विधेयकांवर महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससह काही प्रमुख विरोधी पक्षांनी या प्रस्तावांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात महत्त्वाचे संकेत दिल्याची चर्चा आहे. मतदारसंघ पुनर्रचना करताना लोकसभा मतदारसंघांची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास राष्ट्रवादी शरद पवार गट विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि डीएमके यांनीही या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका दर्शवल्याची माहिती समोर येत असली, तरी संबंधित पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.




