राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर कार्यक्रमात कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आणि शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांचे जोरदार कौतुक केले. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमात बोलताना त्यांनी फडणवीस यांच्या कामाची प्रशंसा करत भावनिक शब्दांत त्यांच्याविषयीचा विश्वास व्यक्त केला. “चांगली माणसं महाराष्ट्रात कायम राहिली पाहिजेत. मात्र पांडुरंगाकडे माझी एकच प्रार्थना आहे की, योग्य वेळ आल्यावर देवेंद्र फडणवीस यांना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळी ही संधी त्यांच्याकडे यावी,” असे वक्तव्य करत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दत्ता भरणे यांनी महायुती सरकारच्या शेतकरी धोरणांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, कर्जमाफीचा निर्णय कोणत्याही निवडणुकीचा विचार करून घेतलेला नाही, तर शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत कर्जमुक्ती योजनेचा लाभ पोहोचावा आणि सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचावेत, यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीची आठवण करून दिली. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रभावित भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आणि मदतीसाठी पुढाकार घेतला, असे भरणे म्हणाले. “फक्त आश्वासन देणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणं कठीण असतं. फडणवीस यांनी ते करून दाखवलं,” असे म्हणत त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.




