शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्ष नेतृत्वाने हालचाली वेगाने सुरू केल्या असून, त्याचाच भाग म्हणून मुंबईतील मातोश्री येथे नाशिकमधील सर्व 15 नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नाशिकमधील राजकीय परिस्थिती, आगामी संघटनात्मक रणनीती आणि पक्षातील एकजूट यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अलीकडच्या काळात ठाकरे गटातील काही लोकप्रतिनिधींबाबत विविध राजकीय चर्चा रंगत असताना या बैठकीकडे विशेष लक्ष लागले होते.
बैठकीनंतर नगरसेवकांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. नाशिकमधील 10 ते 15 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क रंगले होते. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर भेटीसाठी वेळ दिल्यानंतर झालेल्या चर्चेत सर्व नगरसेवकांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी काही नगरसेवकांशी संपर्क साधून प्रभाग विकास निधीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबतच राहणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका सर्व नगरसेवकांनी मांडली. या बैठकीमुळे नाशिकमधील ठाकरे गटात एकजूट कायम असल्याचा संदेश पक्ष कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात गेला आहे.




