कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळण्याचा निर्णय घेतल्याने दोन वर्षांची बंदी
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. आपली ‘पाकिस्तान सुपर लीग’ (PSL) ही आयपीएलपेक्षा सरस असल्याचा दावा करणाऱ्या पीसीबीला परदेशी खेळाडूंनी आरसा दाखवला आहे. झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी याने पीएसएल करारापेक्षा आयपीएलला पसंती दिल्याने संतापलेल्या पीसीबीने त्याच्यावर दोन वर्षांची कडक बंदी घातली आहे. पैशांच्या गणितात आणि खेळाच्या दर्जाबाबत आयपीएलचे पारडे जड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मुझाराबानीची ही कथा अत्यंत रंजक आहे. सुरुवातीला आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही लिलावात त्याला कोणीही खरेदी केले नव्हते. त्यानंतर इस्लामाबाद युनायटेडने त्याला बदली खेळाडू म्हणून ताफ्यात घेतले. मात्र, आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मुस्तफिझुर रहमानसाठी बदली खेळाडू हवा होता. केकेआरने मुझाराबानीला ७५ लाख रुपयांची ऑफर दिली, जी पीएसएलकडून मिळणाऱ्या ३६ लाखांपेक्षा दुप्पट होती. आर्थिक फायदा आणि आयपीएलचे ग्लॅमर पाहून मुझाराबानीने पाकिस्तानला जाण्याऐवजी भारतात येण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पीसीबीची चांगलीच नाचक्की झाली.
केवळ मुझाराबानीच नव्हे, तर स्पेन्सर जॉन्सन आणि दासुन शनाका यांसारख्या खेळाडूंनीही ऐनवेळी पीएसएलला ‘बाय-बाय’ करत आयपीएलची वाट धरली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशवरही अशाच कारणास्तव बंदी घालण्यात आली होती. पीसीबी आता इतर खेळाडूंवरही कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मात्र, खेळाडूंच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात पीएसएलची विश्वासार्हता कमी होताना दिसत आहे, तर दुसरीकडे आयपीएलचे वर्चस्व अधिकच गडद होत आहे.




