आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत पूर आणि त्यासंबंधित दुर्घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, राज्यातील १६ जिल्ह्यांतील ५.६४ लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. शिवसागर, डिब्रुगढ, जोरहाट, गोलाघाट, चराईदेव, धेमाजी, तिनसुकिया, नगाव, बिस्वनाथ, कामरूप आणि कार्बी आंगलाँगसह अनेक भागांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
पुरामुळे ८७२ गावांमध्ये पाणी शिरले असून अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नागरिकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला असून, अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते आणि दळणवळण व्यवस्था बाधित झाल्याने काही भागांचा संपर्कही तुटला आहे. शिवसागर जिल्ह्यात सर्वाधिक १३ मृत्यू नोंदवले गेले आहेत.
पूरस्थितीचा मोठा फटका शेतीला बसला असून २४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. भातासह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून बचावकार्य, मदतवाटप आणि परिस्थितीवर देखरेख सुरू आहे.




