राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळील गोजूबावी येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाला सहा महिने पूर्ण होण्यापूर्वी आलेल्या या जयंतीनिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकाळीच त्यांच्या विमानाला अपघात झालेल्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा खासदार पार्थ पवार, जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला.
“पूर्वी तुमचा जन्मदिवस आनंदाने साजरा करायचे, पण आज तोच दिवस जयंती म्हणून साजरा करताना मन तुटून जाते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवारांचा आधार, त्यांची साथ, शिस्त, सेवाभाव आणि प्रेम आयुष्यभर आपल्या स्मरणात जिवंत राहील, असेही त्यांनी म्हटले. त्यांच्या या भावनिक पोस्टनंतर नेटकऱ्यांनीही श्रद्धांजली व्यक्त केली.




