डोंबिवली (Dombivli) पूर्व परिसरात आज पहाटेच्या सुमारास आग्नितांडव पाहायला मिळाला. सागाव येथील चेडा नगरमधील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत तब्बल २९ दुचाकी जळून खाक झाल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आगीच्या धुरामुळे आणि आगीचा भडका उडाल्याने पाच जण जखमी झालेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेकडील सागाव, चेडा नगर भागात जय भारत स्कूलजवळ रविकिरण सोसायटी ही इमारत आहे. आज पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास, जेव्हा सर्व रहिवासी गाढ झोपेत होते, तेव्हा इमारतीच्या बेसमेंटमधील मोटरसायकल पार्किंगमध्ये अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांनी पेट घेतला. २९ दुचाकींचा कोळसा, ५ रहिवासी जखमी – या भीषण आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २९ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. आगीचा भडका इतका मोठा होता की, त्यामुळे इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर साचला. जीव वाचवण्यासाठी रहिवासी सैरावैरा धावू लागले. या धावपळीत आणि आगीच्या झळा लागल्याने पाच जण जखमी झाले. जखमींपैकी काहींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या ऑप्टिलाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग इमारतीच्या वरील मजल्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवण्यात यश मिळाले.इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.




