मुलुंडमध्ये रंगणार अनवट, अवेळ आणि जोडरागांची मैफिल. स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या दुसऱ्या स्मृतिवर्ष प्रीत्यर्थ शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी स्वरश्री संगीत महाविद्यालय “सुरसमर्पण” या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचे आयोजन करीत आहे. यावेळी श्रीमती वीणा शुक्ल, डॉ.चेतना पाठक, श्रुती गोखले, नीलिमा पुराणिक, स्मिता वाघ, नंदकुमार पाटील आणि पंडित डॉ.विकास कशाळकर हे नामवंत गायक कलाकार अनवट, अवेळ आणि जोडरागांची मैफिल सादर करतील.
याच कार्यक्रमात सूरदुर्गा फाउंडेशन चे उद्घाटन तसेच पंडित डॉ. विकास कशाळकर यांचा पंच्याहत्तरी निमित्त अमृतमहोत्सवी सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त मुलुंड पूर्व येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण सभागृहात सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरसमर्पण ही शास्त्रीय संगीताची मैफिल रंगेल. या कार्यक्रमात श्री.आदित्य पानवलकर आणि श्री ऋषिकेश सुरवसे तबला संगत , तसेच हार्मोनियम वर भक्ती ब्रह्मे घैसासआणि विनय दळवी साथ संगत करतील. कार्यक्रम विनाशुल्क आणि सर्वांसाठी खुला असेल. त्यामुळे अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ . प्रभा अत्रे यांच्या शिष्या आणि स्वरश्री संगीत महाविद्यालयाच्या संचालिका श्रीमती वीणा शुक्ल यांनी केले आहे.




