थोडीशी काळजी, योग्य माती आणि दमट हवामान असेल तर कुंडीतही वेलचीचे भरघोस उत्पादन शक्य
हिरवी वेलची म्हणजे प्रत्येक स्वयंपाकघराचा सुगंध. चहा असो, गोड पदार्थ असोत किंवा खास जेवण – वेलचीशिवाय चव अपूर्णच वाटते. मात्र बाजारात मिळणारी वेलची दिवसेंदिवस महाग होत चालली आहे आणि त्यात भेसळीची शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो –आपण घरीच वेलची उगवू शकतो का?
योग्य पद्धत आणि थोडा संयम ठेवल्यास तुम्ही तुमच्या घरच्या बाल्कनीत किंवा टेरेसवर वेलचीचे रोप सहज वाढवू शकता. एकदा का रोप स्थिरावले की वर्षानुवर्षे ताजी, शुद्ध आणि सुगंधी वेलची मिळत राहते.
घरगुती गार्डनसाठी सर्वात आधी योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे. बाल्कनी, टेरेस, अंगण किंवा खिडकीजवळील मोकळी जागा उत्तम ठरते. त्या ठिकाणी हवा खेळती असावी आणि थेट कडक सूर्यप्रकाश न पडता हलका प्रकाश मिळावा. झाडांसाठी कुंड्या, मातीची भांडी, प्लास्टिकचे डबे किंवा रिसायकल केलेल्या बाटल्याही वापरता येतात.
वेलचीसाठी 12 ते 16 इंच खोल व रुंद भांडे निवडणे गरजेचे आहे, कारण तिची मुळे खोलवर पसरतात. माती हलकी, सेंद्रिय आणि पाण्याचा निचरा होणारी असावी. त्यासाठी बागेची माती, शेणखत आणि कोकोपेट समान प्रमाणात मिसळावे. बियाण्यांपेक्षा रोपवाटिकेतून आणलेले रोप लावणे अधिक सोपे आणि यशस्वी ठरते. मात्र बियाण्यांपासून लागवड करायची असल्यास ताजी बियाणे 24 तास पाण्यात भिजवून पेरावीत. उगवायला साधारण 3 ते 5 आठवडे लागू शकतात.
वेलचीला उष्ण व दमट हवामान मानवते. त्यामुळे फेब्रुवारी ते जुलै हा कालावधी लागवडीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या झाडाला थेट सूर्यप्रकाश नको असतो; दिवसातून 3–4 तास अप्रत्यक्ष प्रकाश पुरेसा ठरतो. माती नेहमी थोडी ओलसर ठेवावी, पण पाणी साचू देऊ नये. जास्त पाणी दिल्यास मुळे कुजण्याचा धोका असतो.
दर 20–25 दिवसांनी गांडूळ खत किंवा शेणखत द्यावे. वाळलेली किंवा पिवळी पाने वेळोवेळी काढून टाकल्यास रोप निरोगी राहते. किडींचा प्रादुर्भाव झाल्यास कडुनिंबाचा अर्क किंवा इतर नैसर्गिक उपाय वापरावेत.
योग्य काळजी घेतल्यास वेलचीचे रोप 2 ते 3 वर्षांत फळ देऊ लागते. जेव्हा वेलचीच्या शेंगा हिरव्या, टवटवीत आणि भरलेल्या दिसतात, तेव्हा त्या तोडाव्यात आणि सावलीत वाळवाव्यात. घरच्या घरी पिकवलेली वेलची बाजारातील वेलचीपेक्षा अधिक टिकाऊ, सुगंधी आणि सुरक्षित असते.
घरात वेलची लावल्याने फक्त मसालाच मिळत नाही, तर घरात हिरवळ वाढते, वातावरण प्रसन्न राहते आणि गार्डनिंगचा आनंदही मिळतो. थोडे प्रेम आणि नियमित काळजी घेतली तर वेलचीचे रोप वर्षानुवर्षे तुमच्या स्वयंपाकघराचा सुगंध वाढवत राहील




