spot_img

Thackeray Brothers : भाजपाचा पत्त्यांचा बंगला कोसळणार” मोदींच्या नावावरच सगळी ताकद असल्याचा राज ठाकरेंचा दावा

spot_img

राज्यातील महापालिका निवडणुकांचे मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, त्याआधीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच ठाकरे कुटुंबाच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांना संयुक्त मुलाखत दिली.

या मुलाखतीत ठाकरे बंधूंनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. यावेळी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येऊन राज्यातील महापालिका निवडणुका लढवत असल्याचेही स्पष्ट झाले. या युतीचा राजकीय परिणाम 16 जानेवारीनंतर समोर येईल, मात्र त्याआधीच ठाकरे बंधूंनी भाजपावर गंभीर आरोप करत वातावरण ढवळून काढलं.

“मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व महापालिका आमच्या ताब्यात यायलाच हव्यात,” असे ठाम मत दोघांनी व्यक्त केले. भाजपाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत बंडखोरीकडे लक्ष वेधलं. संजय राऊत यांनी भाजपातून अनेक नेते बाहेर पडल्याचा उल्लेख केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, “जसं राज म्हणाला, तसं त्यांचा पत्त्यांचा बंगला आता बेपत्ता होईल.” या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज ठाकरे यांनीही भाजपावर खोचक शब्दांत टीका केली. “लहानपणी आपण पत्त्यांचा बंगला बनवायचो. भाजपाकडे पाहिलं तर त्यांचाही बंगला पत्त्यांचाच आहे, पण तो उलटा आहे. सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे,” असं ते म्हणाले. आज भाजपाला मिळणारी सगळी मतं ही केवळ नरेंद्र मोदी यांच्या नावावर असल्याचा दावा त्यांनी केला. “इतर कोणाच्याही नावावर मतदान होत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे यांनी स्थलांतर आणि राज्याबाहेरील लोकसंख्येच्या प्रश्नावरही भाष्य केलं. “आपल्याला सांगितलं जातं की महाराष्ट्रातला माणूस देशात कुठेही जाऊन राहू शकतो. पण इतर राज्यांत तसं खरंच होतं का? तिकडे येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवलं जातं. मात्र आपल्याकडेच आमचेच लोक सांगतात की कोणीही कुठेही येऊन राहू शकतं,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकूणच, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही एकत्रित भूमिका भाजपासाठी मोठं आव्हान ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ