महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाक्युद्ध पेटलं; ‘डबल सर्टिफाईड मुंबईकर’ म्हणत मुख्यमंत्र्यांना सुनावलं
महापालिका निवडणुकांची चाहूल लागताच राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ठाकरे बंधूंसह विरोधकांवर जोरदार टीका केली होती. त्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तितक्याच तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी “मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले, पण शहराचा विकास करू शकले नाहीत” असा टोमणा विरोधकांना मारला होता. या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “आम्ही मुंबईत जन्मलो आणि संघर्ष करत म्हातारे झालो म्हणूनच मुंबई महाराष्ट्रात टिकून आहे. आमच्या आधीच्या पिढीने बलिदान दिलं, म्हणूनच आज तुम्ही मुंबईत बसून राज्यकारभार करू शकता.”
राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वयावरही अप्रत्यक्ष टोला लगावला. “तुम्ही अजून तरुण आहात. मग नागपूरचा नेमका काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देत आहेत, हे मी स्वतः पाहिलं आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी आपल्याला मुंबईबाहेरचा ठरवल्याने आपण ‘सर्टिफाईड नागपूरकर’ झालो असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावरही राऊतांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. “नागपूरकर असणं ही अभिमानाची गोष्ट आहे. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर असाल, तर आम्ही ‘डबल सर्टिफाईड मुंबईकर’ आहोत,” असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
मुंबईबाबत बोलताना राऊत म्हणाले, “ही मुंबई आम्हाला आयती मिळालेली नाही. जमिनीतून भुईमुगाच्या शेंगा किंवा बटाटे जसे उगवतात, तशी ही मुंबई मिळालेली नाही. ती आम्ही संघर्षातून मिळवली आहे. आम्ही लढत असताना फडणवीसांचा जन्मही झालेला नव्हता. मग गब्बरसारखे डायलॉग मारायची गरज काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘युतीमधले लूझर’ म्हटल्याबद्दलही राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. “कोण लूझर आणि कोण विनर आहे, हे निवडणुकांत जनता ठरवेल. मुंबईची जनता कायम ठाकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे, हे फडणवीसांनाही माहीत आहे. ठाकऱ्यांशिवाय मुंबई म्हणजे कमकुवत महाराष्ट्र—हे लक्षात ठेवा,” असा इशाराही त्यांनी दिला. एकूणच, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबईच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष अधिक चिघळताना दिसत आहे.




