कॅल्शियम-प्रोटीनने समृद्ध दूध आरोग्यासाठी उत्तम असले तरी काही आजारांमध्ये रात्रीचे दूध ठरू शकते हानिकारक
दूध हे संपूर्ण पोषण देणारे नैसर्गिक पेय मानले जाते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी दूध उपयुक्त आहे. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे असतात. ही तत्त्वे हाडे व दात मजबूत ठेवण्यास मदत करतात तसेच शरीराला ऊर्जा देतात. दुधातील प्रोटीन स्नायूंची वाढ आणि दुरुस्ती करते, तर ट्रिप्टोफॅनमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
सामान्यतः सकाळी किंवा संध्याकाळी दूध पिणे फायदेशीर मानले जाते. कोमट दूध पिल्याने पचन सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि शरीरातील आम्लता नियंत्रणात राहते. त्वचेचे आरोग्य सुधारते, थकवा कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र, प्रत्येकासाठी रात्री दूध पिणे योग्य असेलच असे नाही.
तज्ज्ञांच्या मते, काही लोकांनी झोपण्यापूर्वी दूध पिणे टाळावे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा आधीच लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांमध्ये रात्री दूध पिल्याने कॅलरी आणि चरबी शरीरात साठू शकते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
सायनस, सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये दूध घेतल्याने कफनिर्मिती वाढू शकते. त्यामुळे अशा लोकांसाठी रात्री दूध हानिकारक ठरू शकते. तसेच टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांनीही काळजी घ्यावी. दुधातील दुग्धशर्करा (लॅक्टोज) रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकते.
लॅक्टोज असहिष्णुता असलेल्या लोकांना दूध मानवत नाही. दूध घेतल्यास पोटदुखी, जुलाब, सूज आणि अस्वस्थता जाणवू शकते. याशिवाय गॅस, अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास असलेल्या व्यक्तींनीही रात्री दूध टाळणेच योग्य ठरते, कारण त्यामुळे समस्या अधिक तीव्र होऊ शकतात.
एकंदरीत, दूध आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी ते योग्य प्रमाणात आणि योग्य वेळीच घ्यावे. आपल्या प्रकृतीनुसार आणि आरोग्यस्थितीनुसार दूध सेवनाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही हिताचे ठरते.




