spot_img

Sanjay Raut : बिनविरोध निवडणुकांवर राऊतांचा घणाघात; निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट झाल्याचा आरोप

spot_img

धमकी, पैसा आणि यंत्रणांच्या गैरवापरातून निवडणुका; आयोगाच्या ‘क्लीनचीट कारखान्या’वर संजय राऊतांची जोरदार टीका

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली असली, तरी मोठ्या प्रमाणावर झालेल्या बिनविरोध निवडणुकांमुळे वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, बिनविरोध निवडणुका या कुठल्याही लोकशाही मार्गाने झालेल्या नाहीत, हे निवडणूक आयोगालाही स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, तरीही आयोगाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि संबंधित अधिकाऱ्यांना क्लीनचीट देण्यात आली, हे अत्यंत धक्कादायक आहे. धमकी, पैशांचा वापर आणि प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर करून उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

राऊत यांनी दावा केला की, अनेक ठिकाणी उमेदवारांना पैसे देऊन टोकण घेण्यात आली आणि नंतर त्यांना अर्ज भरू दिले गेले नाहीत. आप, जनता दल, शिवसेना आणि मनसेचे उमेदवार रांगेत उभे असतानाही त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत. बबन महाडिक यांना विधानसभा अध्यक्षांच्या दबावामुळे उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

“निवडणूक आयोगाचे डोळे बंद झाले आहेत का, की त्यांच्या डोळ्यांत गारगोटे घातले आहेत?” असा सवाल उपस्थित करत, जर हे सर्व दिसत नसेल तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या निवडणूक आयोगाच्या काळात तब्बल ७० ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. यापूर्वी महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडणुका कधीच झाल्या नाहीत. मनोहर जोशींसारखे मोठे नेते असतानाही नगरसेवकपदाच्या निवडणुका कधी बिनविरोध झाल्या नाहीत, याची आठवण करून दिली.

“शिंदे गट आणि भाजपाच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बिनविरोध निवडून आणले जात आहे आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीनचीट देत आहे,” असा घणाघात राऊतांनी केला. निवडणूक आयोगाचा हा ‘क्लीनचीट कारखाना’ राज्य आणि देशाच्या लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

नियमांच्या बाहेर जाऊन काम करणे, कायद्याचे उल्लंघन करणे आणि सत्ताधाऱ्यांना फायदा होईल अशीच भूमिका घेणे, असे आरोप करत संजय राऊत यांनी इशारा दिला की, निवडणूक आयोगाला या प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल, कारण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ