कांदिवली–बोरिवली सहाव्या मार्गिकेसाठी २१५ लोकल फेऱ्या रद्द; एसी आणि १५ डब्यांच्या जलद गाड्यांनाही फटका
मुंबईकरांची रोजची श्वासवाहिनी असलेल्या लोकल सेवेला पुढील दोन दिवस मोठा अडथळा येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा विशेष मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहेत. अनेक फेऱ्या रद्द केल्या जाणार असून काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी शक्यतो प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही नवीन मार्गिका विद्यमान जलद मार्गाशी जोडण्यासाठी तसेच आवश्यक तांत्रिक आणि यांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. परिणामी अप–डाऊन जलद मार्गांसह पाचव्या मार्गिकेवरील वाहतूकही या काळात पूर्णतः बंद राहणार आहे.
या मेगाब्लॉकचा कालावधी मुख्यत्वे मध्यरात्रीचा असला, तरी त्याचा परिणाम पहाटे आणि सकाळच्या लोकल सेवांवर होणार आहे. मंगळवारी अप जलद मार्गावर मध्यरात्री १२ ते बुधवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत, तर डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. यामुळे मंगळवारी ९३ आणि बुधवारी १२२ अशा एकूण २१५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, या रद्द फेऱ्यांमध्ये प्रवाशांच्या पसंतीच्या एसी लोकल तसेच १५ डब्यांच्या जलद लोकलचाही समावेश आहे. पाचव्या मार्गिकेवरील वाहतूक ठप्प राहिल्याने उर्वरित गाड्यांना विलंब होण्याची दाट शक्यता असून, त्याचा थेट फटका रोजच्या प्रवाशांना बसणार आहे.
दरम्यान, लोकल प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असतानाच लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. नववर्षात वाढलेली प्रवासी गर्दी आणि वेटिंग लिस्ट लक्षात घेऊन ३१ जानेवारी २०२६ पर्यंत काही प्रमुख गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल–नवी दिल्ली तेजस राजधानी (१२९५१/५२) या गाडीला एक अतिरिक्त 3AC डबा जोडून ती आता २२ डब्यांसह धावेल. तसेच साबरमती–नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानी (१२९५७/५८) गाडी २३ डब्यांची करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई–अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसलाही अतिरिक्त डबे जोडण्यात आले असून, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.




