spot_img

Navi Mumbai : ऍड. अरविंद माने यांचा उमेदवारी अर्ज बाद माने यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर केले गंभीर आरोप

spot_img

नवी मुंबई (Navi Mumbai) महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत ऐरोली येथील प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे अधिकृत उमेदवार म्हणून ॲड. अरविंद माने (Arvind Mane) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्यासोबत कैलास काटे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ॲड. अरविंद माने यांचा उमेदवारी अर्ज सही नसल्याचे कारण दाखवून निवडणूक आयोगाने बाद केल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. अरविंद माने यांनी या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, “माझ्या अर्जावर सर्व आवश्यक सह्या स्पष्टपणे करण्यात आल्या असून त्या अर्जावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचीही सही आहे. असे असतानाही ‘सही नाही’ असे कारण दाखवून माझा अर्ज कसा बाद केला जाऊ शकतो?” ते पुढे म्हणाले की, दहावी-बारावी शिक्षण घेतलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, मात्र मी स्वतः कायद्याचा अभ्यास केलेला वकील असूनही सर्व नियमांचे पालन करून अर्ज भरल्यानंतरही माझा अर्ज बाद होणे हे संशयास्पद आहे.

ॲड. अरविंद माने यांनी आरोप केला की, याबाबत विचारणा केली असता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली व तिथून जाण्यास सांगण्यात आले. या अन्यायकारक निर्णयाविरोधात आपण न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, सहउमेदवार कैलास काटे यांनी कोणतीही माहिती पक्षाला न देता अचानक संपर्क तोडल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ॲड. अरविंद माने यांनी वारंवार फोन करून भेटण्याचा प्रयत्न केला असतानाही कैलास काटे यांनी फोन बंद ठेवले. नंतर तृतीय व्यक्तींमार्फत कैलास काटे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याची माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला, कोणाच्या दबावाखाली निर्णय घेण्यात आला का, याचा शोध घेण्यासाठी संबंधित व्यक्तींच्या सीडीआर (Call Detail Record) तपासणीसाठी अर्ज करण्यात आल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून लोकशाही मूल्यांवर घाला घालण्याचा हा प्रकार असल्याचा गंभीर आरोप करत, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ॲड. अरविंद माने यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ