नवी मुंबईत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी कठोर कारवाईची तयारी
विजय गायकवाड – नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया 15 जानेवारी 2026 रोजी सुरु आहे. या कामकाजा दरम्यान घणसोली निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना गोडे यांना एका व्यक्तीकडून धमकी, दबाव आणि बदनामीचा धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनासारखा आहे आणि निवडणुकीच्या निष्पक्षतेला धोका निर्माण करतो.
प्राथमिक तपासात असे आढळले की संबंधित व्यक्तीने थेट निवडणूक कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, अधिकारी यांच्या खाजगी फोन आणि व्हॉट्सॲपवर धमक्या दिल्या, तसेच सोशल मीडियावर व्देषपूर्ण मजकूर प्रसारित केला. यावरून अधिकारी यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुन्हा नोंदवून चौकशी सुरू आहे.
महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने सुरु आहे. निवडणूक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कोणताही दबाव, धमकी किंवा हस्तक्षेप खपवला जाणार नाही. सर्व नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कायद्याचे पालन करत शांततेने निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




