गिल, अय्यर, सिराजची पुनरागमन; काही युवा खेळाडूंना डच्चू
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत असून, या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. या संघात शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांची पुनरागमन झाले आहे, तर तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड आणि ध्रुव जुरेल यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
न्यूझीलंडचा संघ मजबूत मानला जात असून, भारताला ही मालिका जिंकण्यासाठी सर्वोत्तम संयोजनासह मैदानात उतरावं लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल करणार असल्याची शक्यता आहे. गिलच्या पुनरागमनामुळे यशस्वी जैस्वालला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फलंदाजी करताना दिसू शकतो, मात्र अय्यरचा सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.
पाचव्या क्रमांकावर केएल राहुलला संधी मिळण्याची दाट शक्यता असून, विकेटकीपर म्हणूनही तोच पहिली पसंती ठरू शकतो. त्यामुळे ऋषभ पंतला अंतिम संघात स्थान मिळणं कठीण ठरू शकतं. अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
गोलंदाजी आघाडीत फिरकीची जबाबदारी कुलदीप यादवकडे असण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते, तर तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णा यांच्यात चुरस असू शकते.
न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका भारतासाठी महत्त्वाची मानली जात असून, नव्या आणि अनुभवी खेळाडूंच्या योग्य समन्वयावर टीम इंडियाचं यश अवलंबून असणार आहे.




