वनडे संघाची आज घोषणा, काहींसाठी औपचारिकता तर शमीसाठी निर्णायक क्षण
नव्या वर्षातील भारतीय संघाची पहिली आंतरराष्ट्रीय लढत न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येत असून 11 जानेवारीपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात सुरुवातीला तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार असून, त्यासाठी आज 3 जानेवारी रोजी भारतीय संघाची घोषणा होणार आहे.
एकूणच पाहता ही मालिका फार मोठ्या चर्चेची नसली, तरी काही खेळाडूंसाठी ही संघनिवड अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण या घोषणेमुळे त्यांच्या टीम इंडियातील भवितव्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. अशाच खेळाडूंमध्ये सर्वात मोठं नाव आहे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं.
शनिवारी चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची ऑनलाइन बैठक होणार असून, त्यानंतर वनडे स्क्वॉड जाहीर केला जाईल. बीसीसीआयकडून ही घोषणा अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडियावर केली जाणार आहे. दरम्यान, या सीरीजपूर्वीच काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. ऋषभ पंतला वगळलं जाऊ शकतं, तर हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना फिटनेस व्यवस्थापनासाठी विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर शमी बराच काळ टीम इंडियाच्या बाहेर आहे. या कालावधीत त्याच्या फिटनेस आणि कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. इतकंच नाही, तर शमी आणि अजित आगरकर यांच्यात या मुद्द्यावरून शाब्दिक वादही रंगला होता. आगरकर फिटनेसबाबत साशंक होते, तर शमीने मैदानात उतरूनच उत्तर देणं पसंत केलं.
सध्या मात्र परिस्थिती शमीच्या बाजूने झुकलेली दिसते. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून तो सातत्याने देशांतर्गत क्रिकेट खेळतोय आणि प्रभावी कामगिरी करतोय. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यात त्याने सात इनिंग्समध्ये 20 विकेट्स घेतल्या, तर सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत 7 सामन्यांत 16 बळी टिपले. विजय हजारे ट्रॉफीत बंगालकडून खेळताना त्याने 4 सामन्यांत 8 विकेट्स घेऊन आपली धार कायम असल्याचं दाखवून दिलं आहे.
फॉर्म आणि फिटनेस दोन्ही बाबतीत शमीने स्वतःला सिद्ध केलं आहे. शिवाय, आगामी टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता काही प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्याचा विचार असल्याने, त्या जागी अनुभवी शमीची निवड होणं शक्य वाटतंय. त्यामुळे आज होणारी संघघोषणा ही केवळ औपचारिक न राहता, मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची नांदी ठरते का, याकडे साऱ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.




