spot_img

Cricketer Retirement : सिडनी कसोटीपूर्वी दिग्गज फलंदाजाची निवृत्ती

spot_img

14 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम; माध्यमे आणि माजी खेळाडूंवर वर्णद्वेषाचे गंभीर आरोप

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि भरोसेमंद फलंदाज उस्मान ख्वाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंडविरुद्ध Ashes मालिका जिंकल्यानंतर, सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी ख्वाजाने हा निर्णय जाहीर करत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

2 जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ख्वाजाने आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे, 2011 मध्ये ज्या सिडनी मैदानावर त्याने इंग्लंडविरुद्ध Ashes मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, त्याच मैदानावर 14 वर्षांनंतर त्याचा कसोटी कारकिर्दीचा शेवट होणार आहे. सिडनी हेच त्याचं होम ग्राऊंड असून, फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिलाही सामना त्याने इथेच खेळला होता.

निवृत्तीची घोषणा करताना ख्वाजाने केवळ क्रिकेटबद्दल नव्हे, तर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत झालेल्या वागणुकीबद्दलही तीव्र भावना व्यक्त केल्या. ऑस्ट्रेलियन मीडिया आणि काही माजी क्रिकेटपटूंनी नेहमीच आपल्यावरच शंका घेतली, असा आरोप करत त्याने वर्णद्वेषाचे गंभीर संकेत दिले. “मी कृष्णवर्णीय क्रिकेटपटू आहे. अनेक वेळा मला मुद्दाम वेगळं वागवलं गेलं. पर्थ कसोटीमध्ये माझी पाठ दुखावली होती, ते माझ्या हातात नव्हतं. पण त्या दुखापतीवरून ज्या पद्धतीने माझ्यावर टीका झाली, ती खूप त्रासदायक होती,” असं ख्वाजा म्हणाला.

पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यात फिल्डिंगदरम्यान पाठदुखीचा त्रास झाल्यामुळे तो दोन्ही डावात फलंदाजी करू शकला नव्हता. सामन्यापूर्वी त्याने गोल्फ खेळल्यामुळे त्याच्यावर आळशीपणाचे आणि तयारी नसल्याचे आरोप झाले. “इतर खेळाडूंनाही अशा दुखापती झाल्या आहेत, पण त्यांना कधीच अशा प्रकारे लक्ष्य केलं गेलं नाही,” असा मुद्दा मांडत ख्वाजाने ही वागणूक वर्णद्वेषाशी जोडलेली असल्याचं स्पष्ट केलं.

पाकिस्तानी वंशाचा असलेला 39 वर्षीय उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलियासाठी 87 कसोटी सामने खेळला आहे. 157 डावांत त्याने 43 च्या सरासरीने 6206 धावा केल्या असून, यात 16 शतके आणि 28 अर्धशतके आहेत. त्याचबरोबर 40 एकदिवसीय सामन्यांत 1554 धावा, तर 9 टी-20 सामन्यांत 241 धावा त्याच्या नावावर आहेत. सध्या सुरू असलेल्या Ashes मालिकेत त्याने 5 डावांत 153 धावा केल्या असून एक अर्धशतक झळकावलं आहे. सिडनी कसोटी ही केवळ मालिकेचीच नव्हे, तर उस्मान ख्वाजाच्या प्रदीर्घ आणि संघर्षमय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची अखेरची आठवण ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ