गोरेगावमधील बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून, या प्रकरणात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना हेमलता बाणे हिचं नाव समोर आलं आहे. या प्रकरणाला मनोरंजनविश्वात विशेष महत्त्व मिळालं कारण हेमलता ही लोकप्रिय मालिका ‘आई कुठं काय करते’ मधील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर (Archana Patkar) यांची सून असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अर्चना पाटकर यांनी अलीकडेच या नात्याबाबत स्पष्ट भूमिका घेत, हेमलताचा आमच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी हेही नमूद केलं की, त्यांचा मुलगा आणि हेमलता हे गेल्या चार वर्षांपासून वेगळे असून घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
हेमलता बाणेसोबत (Hemlata Bane) अमरीना मॅथ्यू फर्नांडिस नावाच्या दुसऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. एकेकाळी लावणीच्या ठेक्यावर प्रेक्षकांची दाद मिळवणारी हेमलता बाणे सध्या मात्र गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे. अलीकडच्या काळात हेमलता सोशल मीडियावर सक्रिय असून, ती इन्स्टाग्रामवर रील्स आणि डान्स व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिने स्वतःच्या प्रोफाइलमध्ये ‘डिजिटल क्रिएटर’ असा उल्लेख केला आहे. मात्र आता खंडणी प्रकरणात अटक झाल्यानं ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.




