5व्या आणि अंतिम सामन्यात भारताची 5-0 ने मालिका जिंकण्याची संधी, श्रीलंकेपुढे मान राखण्याचं आव्हान
श्रीलंका महिला क्रिकेट संघ 2025 वर्षातील आपला शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका महिला संघांमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व राखत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. आता पाचव्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून भारताला मालिका 5-0 ने जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
दुसरीकडे, सलग चार सामने गमावलेल्या श्रीलंका संघासमोर हा सामना प्रतिष्ठेचा प्रश्न ठरला आहे. कर्णधार चमारी अट्टापट्टूच्या नेतृत्वाखाली श्रीलंका अखेरच्या सामन्यात विजय मिळवून क्लीन स्वीप टाळणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
हा पाचवा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना मंगळवार, 30 डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. याच मैदानावर मालिकेतील सलग तिसरा सामना रंगणार आहे. सामन्याची सुरुवात संध्याकाळी 7 वाजता होईल, तर टॉस 6:30 वाजता होणार आहे.
प्रेक्षकांना हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर पाहता येईल. मोबाईल आणि ऑनलाइन प्रेक्षकांसाठी जिओहॉटस्टार अॅपवर सामन्याचं थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.
पहिल्या चार सामन्यांत श्रीलंकेच्या फलंदाजी आणि गोलंदाजीला भारतीय संघासमोर फारसा प्रभाव टाकता आला नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ विजयी शेवट करण्यासाठी सज्ज आहे. आता अखेरच्या सामन्यात श्रीलंका लाज राखणार की भारत विजयी पंच लगावणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.




