spot_img

Bhandup Bus Accident : भांडूप पश्चिमेला बस अपघाताचा धक्का; चार जणांचा मृत्यू, अनेक जखमी

spot_img

स्टेशनजवळ इलेक्ट्रिक बस रिव्हर्स घेताना नियंत्रण सुटले; चालक ताब्यात, चौकशी सुरू

भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात काल रात्री घडलेल्या बस अपघाताने मुंबई हादरली. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास कार्यालयातून परतणारे नागरिक घरी जाण्यासाठी घाईत होते. काहीजण पायी चालले होते, तर काही बससाठी रांगेत उभे होते. याच वेळी एका इलेक्ट्रिक बसने रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस मागे सरकली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. बसची धडक बसल्याने काही नागरिक जखमी झाले, तर दुर्दैवाने चौघांचा मृत्यू झाला. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यापैकी एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आहे.

अपघातानंतर पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे. चालकाने मद्यप्राशन केले होते का, तो अनुभवी होता की नवखा, तसेच बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड होता का, यासह सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.

या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून संपूर्ण चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगणे आणि सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ