फ्रिजवरील दुर्लक्षित लॉक फीचर कसं वाढवतं कंप्रेसरचं आयुष्य, अन्नाची ताजेपणा आणि कमी करतं वीज बिल
घराघरात वापरला जाणारा रेफ्रिजरेटर हा अत्यावश्यक उपकरणांपैकी एक आहे. मात्र, त्यावरील लॉक सुविधा अनेकदा दुर्लक्षित केली जाते. फ्रिजमध्ये दागिने किंवा मौल्यवान वस्तू नसताना त्याला लॉक का दिलं जातं, असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्यक्षात, हे लॉक केवळ सुरक्षिततेपुरतं मर्यादित नसून फ्रिजच्या कार्यक्षमतेशी थेट जोडलेलं आहे.
भारतात बहुतांश घरांमध्ये एसीप्रमाणे रेफ्रिजरेटरची नियमित सर्व्हिसिंग केली जात नाही. परिणामी, कालांतराने फ्रिजच्या दरवाज्यावरील रबर गॅस्केट सैल होऊ शकते. यामुळे थंड हवा बाहेर जाते आणि कूलिंगवर परिणाम होतो. अशा वेळी फ्रिज लॉक केल्यास दरवाजा घट्ट बंद राहतो आणि कूलिंग लीक टाळता येते.
फ्रिज लॉकचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे कंप्रेसरचं आयुष्य वाढणं. दरवाजा नीट बंद राहिल्याने फ्रिजला आतलं तापमान स्थिर ठेवणं सोपं जातं. त्यामुळे कंप्रेसरवर अनावश्यक ताण येत नाही आणि तो वेळेवर ट्रिप होतो, ज्यामुळे त्याची झीज कमी होते.
याच कारणामुळे वीज वापरातही लक्षणीय बचत होते. कंप्रेसर हा फ्रिजमधील सर्वाधिक वीज वापरणारा भाग असल्याने, त्याचं काम संतुलित राहिलं तर वीज बिल आपोआप कमी होतं.
याशिवाय, फ्रिजमध्ये सतत योग्य तापमान राखलं गेल्याने अन्नपदार्थ अधिक काळ ताजे राहतात. भाजीपाला, दूध, फळे यांचा ताजेपणा टिकून राहण्यास लॉक मदत करतो.
सुरक्षिततेच्या दृष्टीनेही फ्रिज लॉक महत्त्वाचा आहे. घरात लहान मुले असतील तर ते वारंवार फ्रिज उघडण्याचा धोका असतो. यामुळे केवळ कूलिंगवर परिणाम होत नाही, तर अपघाताची शक्यताही वाढते. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी फ्रिज लॉक उपयुक्त ठरतो.
थोडक्यात सांगायचं झालं तर, फ्रिजवरील लॉक हे एक साधं पण अत्यंत फायदेशीर फीचर आहे. योग्य वापर केल्यास ते कूलिंग सुधारते, वीज वाचवते, कंप्रेसरचं आयुष्य वाढवते आणि सुरक्षितताही सुनिश्चित करते.




