ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे
जुन्नर (Junnar) तालुक्यातील ओतूर जवळील अमीरघाट येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली आहे.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे माहिती देताना म्हणाले की,ओतूर अमीरघाट परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे येथील नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी वनविभागाकडे केली होती. त्या मागणीनुसार काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता.या पिंजऱ्यामध्ये सोमवारी दि.२२ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अंदाजे सहा ते सात महिन्याची बिबट्याची मादी जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच तात्काळ सदर ठिकाणी ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे वनपाल,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनरक्षक किशन खरोडे,किसन केदार,गणपत केदार,रोहित लांडे,प्रदीप तांबे यांनी धाव घेत पाहणी करून बिबट्याच्या मादीला ताब्यात घेतले. सोमनाथ ठीकेकर,सचिन दाते,मिथिल इसकांडे,सागर दाते,अमोल ठिकेकर व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले. सदर बिबट्याच्या मादीस माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे. ओतूर आणि परिसरात बिबट व अन्य वन्य प्राण्यासंबंधित कुठलीही समस्या असल्यास, नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




