spot_img

Navi Mumbai Municipal Corporation : निवडणूक पारदर्शकतेसाठी नमुंमपा मुख्यालयात मीडिया मॉनिटरिंग व मीडिया सेंटर कार्यान्वित

spot_img

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती सक्रिय

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.

या अनुषंगाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे यांची मीडिया सेल तसेच माध्यम प्रमाणन व संनियंत्रण कामकाजासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समितीची रचना करण्यात आली आहे.

निवडणूक कालावधीत माध्यमांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर ‘प्रसारमाध्यम निरीक्षण कक्ष (Media Monitoring Center)’ सुरू करण्यात आला आहे. येथे दैनंदिन वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्या, युट्यूब चॅनेल्स तसेच समाजमाध्यमांचे सातत्याने निरीक्षण केले जाणार आहे. यासाठी विविध माध्यमांनुसार स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी गट नेमण्यात आले आहेत. याशिवाय तळमजल्यावरील पत्रकार कक्षात ‘माध्यम कक्ष (Media Center)’ कार्यान्वित करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रसारमाध्यम निरीक्षण कक्षाला भेट देऊन पाहणी केली व तेथे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, प्रशासन उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, मालमत्ता कर उपआयुक्त डॉ. अमोल पालवे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवारांकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन, प्रसारमाध्यमांना निवडणूकविषयक माहिती पुरवणे, आचारसंहितेचे पालन होत आहे का याचे निरीक्षण, पेड न्यूज प्रकरणांची चौकशी व समाजमाध्यमांवरील देखरेख अशी कामे माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीमार्फत करण्यात येणार आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी अधिसूचना जारी केली आहे.

डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) श्रीमती रश्मी नांदेडकर आणि नोडल अधिकारी श्री. सत्यवान उबाळे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. दूरदर्शन, उपग्रह व केबल वाहिन्या, युट्यूब, आकाशवाणी, खाजगी एफ.एम., सिनेमागृहे, सार्वजनिक ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे, ई-वृत्तपत्रे, बल्क व व्हॉइस एसएमएस, समाजमाध्यमे व संकेतस्थळांवर कोणतीही निवडणूक जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी समितीकडून पूर्वप्रमाणन घेणे बंधनकारक आहे. पूर्वप्रमाणनाशिवाय जाहिरात प्रसारित करता येणार नाही.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 साठी 15 डिसेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत सर्व घटकांनी आचारसंहितेचे पालन करावे, तसेच प्रसारमाध्यमांनी समान न्यायाच्या तत्त्वावर वस्तुनिष्ठ वृत्तांकन करावे आणि मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या माध्यमांचा सकारात्मक वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ