थंडीतील सर्दी, सांधेदुखी, कडकपणा आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी लसूण कसा घ्यावा याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
हिवाळा सुरू झाला की शरीराची उष्णता टिकवून ठेवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे गरजेचे ठरते. यासाठी अनेक घरगुती उपायांमध्ये लसणाचा वापर केला जातो. पतंजली योगपीठाचे आचार्य बाळकृष्ण यांनी अलीकडेच लसणाचे महत्त्व आणि त्याच्या योग्य सेवनपद्धतीबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते लसूण हा केवळ स्वयंपाकघरातील मसाला नसून थंडीच्या दिवसांमध्ये शरीरासाठी वरदान आहे.
आचार्य बाळकृष्ण सांगतात की लसूण रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि हृदयरोगाचा धोका घटतो. हिवाळ्यात वाढणारी सांधेदुखी, अंगदुखी किंवा स्नायूंचा कडकपणा कमी करण्यासही लसूण उपयुक्त ठरतो.
थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास लवकर होतो. लसूण शरीरात उष्णता निर्माण करून प्रतिकारशक्ती वाढवतो. तसंच शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो.
लसूण घेण्याच्या योग्य पद्धती आचार्य बाळकृष्णांचे मार्गदर्शन:
१) रात्रभर भिजवून सेवन:
१–२ लसूण पाकळ्या सोलून पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या किंवा पाकळ्या चावा. कोलेस्टेरॉल व रक्तदाब नियंत्रणासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर.
२) कोमट पाण्यासोबत सेवन:
रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत १–२ कच्च्या लसूण पाकळ्या घेणेही तितकेच प्रभावी.
३) वेदनांसाठी लसूण तेल:
५० ग्रॅम लसूण कुस्करून घ्या.
१००–२०० ग्रॅम मोहरी, नारळ किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये गरम करा.
लसूण काळसर झाल्यावर तेल गाळून साठवा.
या तेलाने सांधेदुखी, सूज आणि स्नायूंचा कडकपणा कमी होतो. मज्जासंस्थेला बळकटी मिळते आणि वातदोष शांत होतो.




