सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापर, प्रथिनांनी समृद्ध आणि लॅक्टोज असहिष्णुतेसाठी पर्याय—गाढवीच्या दुधाची वाढती मागणी
गायीचं, म्हशीचं किंवा शेळीचं दूध आपण दैनंदिन जीवनात सहज वापरतो. परंतु याशिवाय गाढविणीचं दूधही काहीजण नियमितपणे सेवन करतात आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम अत्यंत उपयुक्त मानले जातात. आश्चर्य म्हणजे या दुधाची किंमत सामान्य दूधापेक्षा तब्बल दहापट जास्त प्रति लिटर 5 ते 7 हजार रुपये!
साधारणपणे भार वाहण्यासाठी वापरला जाणारा गाढव हा प्राणी कमी उपयोगाचा समजला जातो. पण त्याच्या दुधाचे औषधी आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म इतके प्रभावी आहेत की त्याची किंमत आकाशाला भिडली आहे. अनेक कॉस्मेटिक कंपन्या क्रीम, साबण आणि स्किन केअर उत्पादनांमध्ये गाढविणीचे दूध वापरतात.
शहरी भागात, विशेषत: बेंगळुरू आणि हैदराबादसारख्या तंत्रज्ञान शहरांमध्ये गाढविणीच्या दुधाचे छोटे फार्म वाढताना दिसत आहेत. कच्चं दूध विकलं तरी चांगला नफा मिळतोच, पण त्याचे प्रक्रिया केलेले उत्पादन तर आणखी महाग मिळते. रिपोर्ट्सनुसार, गाढविणीच्या दुधापासून तयार केलेलं चीज प्रति किलो 65,000 रुपये किंमतीत विकलं जातं, तर त्याची पावडर तर 1 लाख रुपये प्रति किलो पर्यंत जाते.
आरोग्यदृष्ट्या बघितल्यास हे दूध प्रथिने, अँटीमायक्रोबियल घटक आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक यांनी समृद्ध असते. हे चांगल्या बॅक्टेरियांची वाढ वाढवून पचन सुधारते आणि पोटाशी संबंधित अडचणी कमी करते. ज्यांना लॅक्टोज असहिष्णुता आहे आणि जे गाय–म्हशीचे दूध पिऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी गाढवीचं दूध चांगला पर्याय ठरू शकतो. शिवाय रक्ताभिसरण सुधारण्यापासून ते जळजळ कमी करण्यापर्यंत अनेक फायदे या दुधात सामावलेले आहेत.




