भावी सूनबाई, अर्जुनची होणारी पत्नी सानिया हिच्यासाठीही त्यांनी साड्या विकत घेतल्याचे समजते.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आता लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा धाकटा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला. मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित उद्योगपती रवी घई यांची नात असलेली सानिया चंडोक हिच्याशी अर्जुनची (arjun Tendulkar) एंगेजमेंट झाली असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे आता तेंडुलकर कुटुंबात लगीनघाई सुरू झाली असून लवकरच त्यांच्या घरी शहनाईचे सूर वाजताना ऐकू येतील अशी चर्चा आहे.
सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली आणि लेक सारा सध्या काशीच्या दौऱ्यावर असून, याचदरम्यान अंजली यांनी त्यांच्या लेकाच्या लग्नासाठी तसेच भावी सूनबाई, सानियासाठी काही साड्या खरेदी केल्या आहेत. अंजली तेंडुलकर यांनी होणारी सून सानिया चंडोक, त्यांच्या स्वत:साठी , लेक सारासाठी आणि काही नातेवाईंकासाठी देखील खास साड्यांची खरेदी केली. सारासह दोन दुकानात जाऊन अंजली यांनी खास कलेक्शन निवडलं,कित्येक तास दुकानात राहून, वेगवेगळ्या साड्या पाहून त्यांनी सर्वांसाठी सुंदर अशा साड्या निवडल्याचं समजतं. दोन्ही दुकाने पारंपारिक हातमाग साड्यांवर केंद्रित होती. बनारसी कारागिरांनी बनवलेल्या उत्कृष्ट हस्तनिर्मित साड्या पाहून अंजली आणि सारा अक्षरश: मंत्रमुग्ध झाल्या. अंजली व सारा या दोघींनी बनारसी साड्या जवळून पाहिल्या आणि विणकामाचे कौतुक केले. त्यांनी कारागिरीची प्रशंसा केली आणि त्यांना जे जे आवडलं ते खरेदी केलं. दुसऱ्या दिवशी, अंजली आणि सारा गोलघरमधील धनवर्षा साड्यांमध्ये गेल्या. त्या नेहमीच्या ग्राहकांप्रमाणे दुकानात बसल्या आणि भरतकाम केलेल्या, ब्रोकेड आणि टिश्यू बनारसी साड्या पाहत होत्या. धनवर्षा सिल्कचे श्याम कपूर म्हणाले की, अंजली यांनी मुख्य लग्न समारंभ, मेहंदी समारंभ आणि रिसेप्शनसाठी वेगवेगळ्या थीम्सना अनुकूल असलेल्या प्रीमियम कलेक्शनमधून साड्या निवडल्या.




