थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा, ऊब आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा सोपा आणि पारंपरिक आहार जाणून घ्या गूळ-चण्याचे खास फायदे
हिवाळा आला की शरीराला उब आणि ऊर्जा जास्त प्रमाणात लागते. त्यासाठी सर्वात सोपा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय म्हणजे गूळ आणि भाजलेले चणे. आपल्या घरातील मोठी माणसंही हे संयोजन रोज घेण्याचा सल्ला देतात. यामागे केवळ परंपरा नाही, तर वैज्ञानिक कारणं आणि पोषणमूल्ये आहेत.
गूळ आणि चणे एकत्र खाल्ल्यास शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा बराच वेळ टिकून राहते. त्यामुळे हिवाळ्यात जाणवणारा थकवा, आळस आणि कमजोरी यावर हा उत्तम उपाय ठरतो.
गूळ-चणे खाण्याचे प्रमुख फायदे
पचन सुधारते
गुळामुळे पचन एन्झाईम सक्रिय होतात, तर चण्यातील भरपूर फायबर आतड्यांची कार्यक्षमता सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
हाडे मजबूत होतात
थंडीमध्ये सांधेदुखी अनेकांना त्रास देते. चण्यात असलेले फॉस्फरस आणि मॅग्नेशियम, तसेच गुळातील कॅल्शियम हाडांना आवश्यक पोषण देऊन वेदना कमी करण्यात मदत करतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
गुळातील आयर्न नव्या रक्तपेशी तयार करण्यास मदत करते आणि रक्त शुद्ध ठेवते. चण्यातील प्रोटीन व खनिजे शरीराला आतून मजबूत करतात. त्यामुळे सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.
त्वचेला नैसर्गिक चमक
गूळ-चणे नियमित खाल्ल्याने रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होते, विशेषतः महिलांमध्ये. शुद्ध रक्तामुळे त्वचेला तेज येते आणि हिवाळ्यातील कोरडेपणा कमी होतो.
दिवसातून किती प्रमाणात खावे?
25–30 ग्रॅम भाजलेले चणे
15–20 ग्रॅम गूळ
अधिक प्रमाणात सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे किंवा वजन वाढणे अशा तक्रारी होऊ शकतात. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यात हे सेवन करणे उत्तम.
हिवाळ्यात ताकद, उब आणि चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी गूळ-चणे हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. मर्यादित प्रमाणात याचा नक्की फायदा होतो!




