उंच इमारतीवरुन पडली सळई,तरुणाचा मृत्यू
मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पूर्वेत मरोळ नाका परिसरात सुद्धा बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मरोळ नाका मेट्रो स्टेशनखाली प्रिविलोन या विकासकाकडून सुरू असलेल्या बांधकाम इमारतीच्या संदर्भाने ही दुर्घटना घडली. सध्या येथे निर्माणधीन इमारतीचे काम सुरू आहे. याच बांधकाम इमारतीच्या सातवा मजल्यावरुन लोखंडी रॉड खाली पडल्याने एका 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नाशिकवरुन मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या 30 वर्षीय व्यक्ती अमर आनंद पगारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे आज सकाळीच ते मुंबईत पोहोचले होते, 11 च्या सुमारास येथील मरोळ नाका परिसरात आले असता ही दुर्घटना घडली.
मरोळ नाका परिसरामध्ये यावेळी प्रेविलोन या विकासाकाकडून सुरू असलेला बांधकाम इमारतीच्या सातवा मजल्यावरून लोखंडी रॉड कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील कूपर रुग्णालयात पाठवला आहे. मुंबईत सातत्याने बांधकाम इमारतीमधून दगड आणि लोखंडी रॉड पडून लोकांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडत आहे. त्यामुळे, कधी गुन्हेगारीने, कधी अपघाताने, कधी बॉम्बस्फोटाने असुरक्षित वाटणारी मुंबई आता उंच इमारतींच्या बांधकामानेही असुरक्षित वाटू लागली आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिकांतही भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.




