लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर देशभरात अलर्ट; जम्मू-काश्मीरपासून महाराष्ट्रापर्यंत उघड होत आहेत धागेदोरे
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात खळबळ माजली आहे. या स्फोटाचे धागेदोरे थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं असून, तपासादरम्यान काही डॉक्टरांची नावेही पुढे आली आहेत. माहितीप्रमाणे, या डॉक्टरांनी जानेवारी महिन्यातच लाल किल्ल्याची रेकी केली होती. पुलवामातील दहशतवादी उमर हा स्फोटात वापरलेल्या i-20 गाडीचा चालक असल्याचंही उघड झालं आहे.
या स्फोटाचा कट मागील काही दिवसांपासून रचला जात असल्याचे पुरावे समोर आले आहेत. दिल्लीमध्ये तब्बल 11 तास गाडी फिरत असल्याचं सीसीटीव्हीत दिसलं आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. एकाच वेळी चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून तपास जोरात सुरू आहे.
मुंब्रा येथील कौसा भागातील एका शिक्षकाच्या घरी एटीएसने छापा टाकून लॅपटॉप, मोबाईल आणि संगणक उपकरणे जप्त केली आहेत. तपासादरम्यान या शिक्षकाचं नाव पुण्यात अटक झालेल्या एका आरोपीच्या चौकशीत पुढे आलं होतं. त्यामुळे एटीएसने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून, नंतर कुर्ल्यातील त्याच्या दुसऱ्या निवासस्थानीही झडती घेण्यात आली.
सध्या महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिस तपासात समन्वय साधत असून, या शिक्षकाचा स्फोट प्रकरणाशी थेट संबंध आहे का याचा शोध सुरू आहे. राजधानी दिल्लीतल्या स्फोटानंतर जारी करण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.




