महाराष्ट्र केसरी किताब पटकवणाऱ्या सिकंदर शेखला अटक
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याला अवैध पिस्तुल विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे.राजस्थानमधील कुख्यात टोळीशी सिकंदर शेखचे संबंध असल्याचं उघड झालं आहे, त्यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे. सिकंदर हा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता आहे. पंजाब पोलिसांनी शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक केली आहे. तपासामध्ये राजस्थानमधील ‘पपला गुर्जर’ टोळीशी सिकंदर शेख याचे संबंध असल्याचं उघड झालं आहे.
सिकंदर शेख हा कोल्हापुरातील गंगावेश तालमीत सराव केलेला नामांकित कुस्तीपटू आहे. तसंच तो महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) किताबाचा मानकरी ठरलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे. सीआयए पथकाने पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, ज्यात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सिकंदर शेखचा समावेश आहे.सिकंदर शेखच्या आई-वडिलांनी त्याच्या निर्दोषतेचा दावा केला आहे. त्यांना वाटतं की सिकंदरला या प्रकरणात फसवलं गेलंय आणि चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. सिकंदरचे वडील, पैलवान रशीद शेख म्हणाले की, “माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने नाव कमावले आहे, कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात गुतवलं आहे. मी आयुष्यभर हमाली करून कमावलेत, मीच हरामचा पैसा कमावला नाही तर माझा मुलगा हरामची कमाई कसा कमवेल? सिकंदरला शेकडो गडा, गाड्या आणि सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळाली. त्याला अशा प्रकारचं काही करण्याची गरजच नव्हती. हिंद केसरी स्पर्धा जवळ आली आहे, तो तयारी करत होता. त्याला खेळू न देण्यासाठी हे काही डावपेच तर नाहीत ना, हे मला समजत नाही.”
या घटनेनंतर कुस्ती विश्वातील ज्येष्ठ पैलवान हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, “सिकंदर शेखने आमच्या गंगावेश तालमीची आणि लाल मातीची अब्रू घालवली. तो खरा महाराष्ट्र केसरी नाही. केवळ पैशासाठी अशा गोष्टी करणं म्हणजे कुस्ती या खेळाचा अपमान आहे. वस्तादाचं न ऐकणारा हा पैलवान आहे, त्याने कुस्तीचं नाव खराब केलं.”




