रशियन तेल आणि व्यापार निर्बंधांमुळे निर्माण झालेला तणाव कमी; भारत-अमेरिका संबंधात पुन्हा सौम्यता
रशियाच्या कच्च्या तेलावरील खरेदीमुळे ताणलेले भारत-अमेरिका संबंध आता हळूहळू सुधारताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यांनी **इराणमधील चाबहार बंदरासंदर्भातील निर्बंध सवलतीचा कालावधी आणखी सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प प्रशासनाने व्यापार, टॅरिफ आणि तेल व्यवहारासारख्या अनेक मुद्यांवर भारतावर दबाव आणला होता. त्याचवेळी इराणसोबतच्या व्यापारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. कारण अमेरिकेने इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत, आणि चाबहार बंदरही त्याच यादीत होतं. मात्र, भारतासाठी विशेष सवलत ठेवण्यात आली होती कारण या बंदरातून भारताचा अफगाणिस्तान आणि मध्य आशियाकडे जाणारा महत्त्वाचा व्यापारमार्ग सुरू राहतो.
अलीकडे अमेरिकेने ही सवलत रद्द करण्याचे संकेत दिल्याने भारतात चिंता वाढली होती. पण आता ट्रम्प यांनी निर्णय बदलत सवलतीचा कालावधी वाढवला असून, भारतीय कंपन्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. चाबहार बंदरावरील अमेरिकी सवलतीची मुदत 27 ऑक्टोबर रोजी संपणार होती.
भारताने 2024 मध्ये इराणसोबत चाबहार बंदराच्या व्यवस्थापनासाठी 10 वर्षांचा करार केला आहे. इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड या भारतीय कंपनीकडे आता शाहिद बेहेश्ती टर्मिनलचे संचालन आहे. भारताने कोणत्याही परदेशी बंदराचे व्यवस्थापन पहिल्यांदाच आपल्या हाती घेतले आहे.
चाबहार बंदर भारतासाठी धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. पाकिस्तानमार्गे न जाता थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. 2003 मध्ये प्रस्तावित या प्रकल्पाचा उद्देश इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरद्वारे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत करणे हा आहे.




