दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. आंदोलनाचा परिणाम मध्य दिल्ली आणि संसद परिसरातील वाहतुकीवर होत असताना, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुरक्षेच्या कारणास्तव १६ मेट्रो स्थानकांवरील प्रवाशांचा प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंद केली आहे. DMRCने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली.
बंद करण्यात आलेल्या स्थानकांमध्ये लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंभा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम यांचा समावेश आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालय या तीन इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो मार्ग बदलण्याची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.
यापूर्वी २० आणि २१ जुलै रोजीही CJPच्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काही स्थानकांवर निर्बंध लावण्यात आले होते. परिस्थितीनुसार मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आली होती. आता पुन्हा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली असून, पुढील आदेशानुसार स्थानकांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.




