त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी आणि चेहरा ताजातवाना दिसण्यासाठी आइस मसाज हा उपाय सध्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. सेलिब्रिटींसह अनेकजण आपल्या स्किनकेअर रूटीनमध्ये या पद्धतीचा समावेश करत आहेत. चेहऱ्यावर बर्फाने हलक्या हाताने मसाज केल्याने त्वचेवरील सूज आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते. तसेच मुरुमांची समस्या आटोक्यात ठेवणे, त्वचेची छिद्रे आकुंचन पावणे, चेहरा अधिक नितळ आणि उजळ दिसणे यासारखे फायदे मिळू शकतात. सकाळी उठल्यानंतर चेहरा किंवा डोळ्यांखाली सूज दिसत असल्यास आइस मसाज आराम देऊ शकतो. नियमित वापरामुळे सुरकुत्या कमी दिसण्यास मदत होऊ शकते आणि मेकअप करण्यापूर्वी हा उपाय केल्यास मेकअप अधिक काळ टिकण्यासही सहाय्य होते.
आइस मसाज करण्यासाठी स्वच्छ सुती कापड किंवा मऊ टॉवेलमध्ये एक-दोन बर्फाचे तुकडे गुंडाळावेत. त्यानंतर बर्फ थेट त्वचेवर न लावता चेहऱ्यावर हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने सुमारे एक ते दोन मिनिटे फिरवावा. हा उपाय नियमित आणि मर्यादित वेळेसाठी केल्यास त्वचेमध्ये ताजेपणा आणि नैसर्गिक ग्लो जाणवू शकतो. मात्र, अतिसंवेदनशील त्वचा, त्वचेचे विकार किंवा थंडीची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी हा उपाय करण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.




