आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा उत्सव मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल होतात. मात्र, प्रत्येकाला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. अशा वेळी भक्तांनी घरच्या घरीही श्रद्धेने विठ्ठल आणि भगवान श्रीविष्णूची पूजा करून आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करू शकतो. 2026 मध्ये आषाढी (देवशयनी) एकादशी 25 जुलै, शनिवारी साजरी केली जाणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास, मंत्रजप आणि श्रीविष्णूची भक्तिभावाने पूजा केल्यास पुण्यप्राप्ती होते. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून देवघरात दिवा, धूप आणि उदबत्ती लावावी. भगवान श्रीविष्णू आणि विठ्ठलाला पिवळी फुले, चंदन आणि तुळशीची पाने अर्पण करावीत. पूजा पूर्ण झाल्यानंतर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा आणि विष्णू स्तोत्रांचे पठण करावे. शेवटी नैवेद्य अर्पण करून प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होते.




