बॉलिवूडची पहिली ‘ॲक्शन हिरोईन’ ठरलेली अरुणा शील्ड्स चंदेरी दुनियेपासून दूर; लंडन-लॉस एंजेलिसमध्ये सुरू केला स्वतःचा मोठा व्यवसाय!
ग्लॅमरच्या या झगमगत्या विश्वात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी अनेक कलाकारांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. पण काही नशीबवान असेही असतात, जे केवळ एका गाण्यामुळे किंवा भूमिकेमुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात. मात्र, या लोकप्रियतेनंतरही काही अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीला रामराम ठोकतात आणि आपले एक वेगळे जग निर्माण करतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे अरुणा शील्ड्स.
अभिनेता विवेक ओबेरॉयच्या ‘प्रिन्स’ या ॲक्शन-थ्रिलर सिनेमात ‘माया’ची मुख्य भूमिका साकारून अरुणाने जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, तरीही या सिनेमातील ‘तेरे लिए’ हे गाणे प्रचंड गाजले. पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेले हे गाणे आज इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या आवडीचे आहे. या गाण्यातील विवेक आणि अरुणाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. विशेष म्हणजे, या सिनेमात स्वतःचे ॲक्शन स्टंट्स स्वतःच करून अरुणाने भारताची पहिली महिला ॲक्शन हिरोईन म्हणून कौतुक मिळवले होते.
यशाच्या शिखरावर असतानाही अरुणाने ग्लॅमर जगतापासून जाणीवपूर्वक लांब राहण्याचा निर्णय घेतला. तिने बॉलिवूडला निरोप दिला आणि तिचे लक्ष मानसशास्त्र (Psychology) आणि अध्यात्माच्या अभ्यासाकडे वळवले. तिने ‘गिल्डहॉल स्कूल ऑफ म्युझिक अँड ड्रामा’ आणि ‘सेंट्रल सेंट मार्टिन्स’ या नामांकित संस्थांमधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले.
आज अरुणा अभिनय क्षेत्रापासून पूर्णपणे दूर असली, तरी ती तिच्या नवीन क्षेत्रात कमालीची यशस्वी झाली आहे. तिने ‘रिटर्न टू काम’ (Return To Calm) नावाचा एक खास हिप्नोथेरपी आणि सायक्योथेरपीचा (Psychotherapy) व्यवसाय सुरू केला आहे. या माध्यमातून ती लंडन, सिलिकॉन व्हॅली आणि लॉस एंजेलिस यांसारख्या मोठ्या शहरांमधील आंतरराष्ट्रीय ग्राहकांना मानसिक आरोग्या संदर्भातील सेवा देत आहे. झगमगती दुनिया सोडून मानसोपचारतज्ज्ञ म्हणून आपले करिअर घडवणाऱ्या अरुणाचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.




