ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्याशी संबंधित घडामोडींनी राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या सुनेने मानसिक छळ झाल्याचा आरोप करत ठाणे येथे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. या तक्रारीमध्ये विनायक राऊत यांच्यासह त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्याबाबतही काही गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कौटुंबिक वादामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असतानाच विनायक राऊत यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गृह विभागाच्या अधिपत्याखालील संरक्षण शाखेने त्यांच्या पोलीस संरक्षणाची सुविधा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संरक्षण शाखेकडून अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, निर्णयाची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वीही त्यांचे संरक्षण काढून घेण्याबाबत पत्र देण्यात आले होते. त्यानंतर विनायक राऊत यांनी आपल्याला सुरक्षा कायम ठेवावी, अशी विनंती संबंधित विभागाकडे केली होती.
मात्र, गृह विभागाने त्यांच्या विनंतीला मंजुरी न देता पूर्वीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आता त्यांचे पोलीस संरक्षण अधिकृतपणे हटवण्यात आले आहे. या निर्णयामागील कारणांबाबत अधिकृतपणे कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नसली, तरी या घडामोडींमुळे राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. एकीकडे कौटुंबिक वाद आणि दुसरीकडे सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय यामुळे विनायक राऊत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, या प्रकरणात पुढे कोणते नवे वळण येते याकडे राजकीय निरीक्षकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.




